गुरुवार, ३ मार्च, २०२२

मनमोकळा संवाद

 " मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुरु झालेत.... तू करतेस का गं?"

" नाही हो काकू , आताशा नाही करत मी"
" तुझी नणंद करायची की !, इथे असताना"
" हो काकू, पण मी हल्ली सारेच उपवास सोडलेत."
"अगं,पण का? "
" आधी मी पण करायचे....आता फक्त मनोभावे नमस्कार करते "
" तुझी नणंद तर आतासुद्धा सासरी ,करते की ! कौतुकच आहे तिचं "

काकू आणि सोनल या दोघींमध्ये, सहज चाललेला संवाद कानी पडला .
सोनलची स्वतःला सिद्ध करण्याची चाललेली धडपड आणि काकूंकडून , तिची घालमेल समजून न घेता , होणारी प्रश्नांची सरबत्ती बघून खूप अस्वस्थ झाले.

संवाद हा फक्त दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवण्याकरिताच असावा का?.... किंवा....स्वतःच स्वतःला समजावत, स्पष्टीकरण देत, त्या संवादातून काहीही निष्पन्न न होत , उगा आपल्यालाच बोल लावत ,विचाराला फाटे फोडत बसायचे ?

असे का होते प्रत्येक वेळी? दोन माणसे आपले वर्चस्व जाणवून देण्याकरिता इतकी का धडपडतात? त्यामुळे सुसंवाद घडतच नाही...वाद नाही... प्रतिवाद नाही... तरीही, त्या बोलण्यातून एखादे मन तरी कलुषित होतेच.....

तटस्थपणे दोन मतप्रवाह समांतर चालत , मनमोकळा संवाद साधू शकतात. मात्र असे प्रत्येक वेळी घडत नाही. 'स्वतःचे महत्त्व जाणवून देणे!' हा प्रत्येक संवादातील अडसर ठरतो . स्वतःला सिद्ध करण्याची ती धडपड ठरते .

आपण जसे आहोत तसे दाखवण्यात काय वावगे आहे ? उगाच समोरचा म्हणतो आहे , म्हणून त्याच्या विचारांशी साधर्म्य राखत स्वतःला त्या साच्यात बसण्याकरता , सारवासारव करण्यात आपण स्वतःलाच फसवितो .


कधी कधी स्वतःला मोठेपणा देण्याच्या नादात इतरांना तुच्छ लेखतो. इतरांच्या कागाळ्या करीत होऊ घातलेला संवादही घातकच!
दुसर्‍याच्या मताचा आदर करताना ,आपली मते, आपले विचार ,अभिव्यक्त करण्याकरता का म्हणून बुजरेपण घ्यायचे ? विचारात मतभेद असणारच. आपल्या मतांना प्रत्येकाकडून पसंती मिळेलच असे नाही . मात्र ती मते मनात दडपून समोरच्या व्यक्तीच्या मतांप्रमाणे स्वतःला सिद्ध करण्याची रस्सीखेच कशासाठी?
त्यांच्या मतांचा आदर करा .विचारांना मान द्या. मात्र स्वतःच्या मतांना निरर्थक समजू नका .स्वतःचे विचार तोकडे समजू नका .
स्वतःची प्रतिमा दुसऱ्यांच्या नजरेतून उतरेल, या भीतीचा बागुलबुवा मानगुटीवर घेऊन वावरल्यास आपण आपल्याच नजरेतून स्वतःला कमी लेखतो.
दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे स्वतःची आभासी प्रतिमा उभी करून त्यांच्या नजरेत मोठेपणा मिरवणे , हे आपल्या स्वप्रतिमेला कमी लेखणे होईल. स्वाभिमानाला गेलेला छेद, आत्मविश्वासाला गेलेला तडा होईल. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पराजय होईल.

इथे जिंकणे_हरणे  हा प्रश्नच नाही. तो काही वादविवाद नव्हे....एक वादी तर दुसरा प्रतिवादी... हा मुद्दाच गौण ठरतो. कारण येथे दोन किंवा चार माणसात होऊ घातलेला संवाद आहे... साधी जुजबी बोलचाल आहे... मात्र तो सुसंवादाकडे जरी वळला नाही तरी विसंवाद बनून , त्याचे ओरखडे मनावर उमटवून घेण्यात काय अर्थ ? अशावेळी मौनच बरे !
मग काय? स्वतःची बाजूही मांडायला नको किंवा दुसर्‍याच्या मताला कमी लेखत, प्रत्युत्तर ही द्यायला नको. पण!
पण , असे फार कमी जणांना जमते. कारण मनुष्यप्राणी हा संवादाशिवाय जगूच शकत नाही .

तर मग कसा असावा संवाद?..... मनमोकळा...कुठल्याही मताच्या दबावाला बळी न पडता, दोन भिन्न विचारांना एकमेकात गुंफून सहज-सोप्या रीतीने एकमेकांना काही क्षणांकरिता मिळणारा सोबतीचा विसावा असावा संवाद... रोजच्या रहाटगाडग्यातून मिळणारी क्षणभर विश्रांती असावी,हा संवाद....

हीच सुसंवादाकडे जाणारी वाटचाल ठरावी. ज्यातून काहीही निष्पन्न न होताही मनाची ओंजळ विविध विचारधारेच्या अमृतकुंभाने वाहत राहावी आणि स्वतःसोबत इतरांनाही या विचारांनी समृद्ध करावी .

कोणतेही कलुषित मनात न ठेवता , मोठेपण सिद्ध न करता हा संवादाचा झरा एकमेकांच्या जाणिवा परिपक्व करण्याकरिता सदोदित प्रवाही असावा.....काळाच्या अखंड चालणाऱ्या चक्रासोबत🙏🏻
©® वीणा विजय रणदिवे ✍️

( लेख कसा वाटला आवर्जून कळवावे 👍 काही मतमतांतरे असतीलच याबद्दल दुमत नाही पण संवादाने आपण जवळीक साधूया 🌹मतांमधील दुरावा नको🌹)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा