"ताई, घरी येता का लवकर?" लक्ष्मीचे फोनवरील बोलणे ऐकून विभाचे विचारचक्र वाऱ्याच्या वेगाने धावत सुटले........
"काय झालं असेल?", "पृथाने परत आकांडतांडव केलं असेल का?", "की जेवताना अस्ताव्यस्त पसारा केला असेल?", "की जेवलीस नसेल?"...... अनेक प्रश्न डोक्यात थैमान मांडत होते. त्याच विचारात तिने कारण सांगून तात्काळ सुट्टीचा मेल, मॅनेजरला फॉरवर्ड केला आणि ती तातडीने घराकडे निघाली.
घरी पोहोचताच, घरातील दृश्य विचारांच्या पलीकडचे होते. पृथा हातपाय आपटत होती. तोंडातून लाळ निघत होती. अन्न विखुरले होते. लक्ष्मी आवरसावर करीत पृथाला समजवण्याचा प्रयत्न करीत होती.
विभाने घरात प्रवेश करताच, पृथाने किंचाळायला सुरुवात केली. कसेबसे तिला थोपटत, तिने तिचा चेहरा पाण्याने धुतला. पुसून काढला. तिला बेडरूम मध्ये नेले. तिची आवडती खेळणी, तिच्या आजूबाजूला ठेवली. तिची लाडाची बाहुली, तिच्या कुशीत ठेवली. तिच्या केसातून हात फिरवत, तिला शांत करण्याचा प्रयत्न करु लागली.
हल्लीचे हे पृथाचे कावरेबावरे होणे, कावरेबावरे होऊन आक्रमक होणे, तिच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे होते. कोरोनाच्या काळातील,आईबाबांच्या आकस्मिक जाण्याने, आधीच ती मनाने खचून गेली होती. समीरचा तिला मानसिकदृष्ट्या पाठिंबा असला तरी त्याची मदत आणि भावनिक आधार अपुरा पडत होता. आई-बाबा होते तोपर्यंत पृथाला बऱ्यापैकी सांभाळून घ्यायचे.
सात वर्षाची पृथा! वयाने मोठी झाली तरी तिच्या मेंदूची वाढ अविकसित होती. मानसिक व्यंग घेऊनच, ती जन्माला आली होती. पहिले काही महिने, समीर आणि विभाच्या हे ध्यानीमनीही नव्हते. मात्र तिच्या वयाच्या मुलांच्या तुलनेत, पृथाची वाढ जेमतेमच होती. पालथे होणे, हातापायांची हालचाल, प्रतिसाद देणे....इ.गोष्टींतली तिची संथ प्रगती त्यांच्या चिंतेला कारण ठरत होती.
एक दिवस अचानक पृथाने झटके द्यायला सुरुवात केली. हात पाय थंड पडले. डोळे पांढरेफट्ट झाले. लगेचच दोघांनी, डॉक्टरांकडे तिला हलवले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. अनेक चाचण्या केल्या. त्यात काही मेंदूच्याही होत्या. त्यात तिच्या मेंदूची पुरेशी वाढ झाली नव्हती. त्यामुळे परिस्थिती अनुरूप वयाच्या प्रत्येक टप्प्याच्या अनुषंगाने तिची वाढ होत नव्हती. तिचे शरीर अवचित, आकस्मिक बदलांना स्विकारित नव्हते. अपरिपक्व मेंदू तिला मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तयार नव्हता. त्याचा परिणाम तिच्या हालचालींवर आणि शरीराच्या प्रतिसाद देण्यावर होत होता.
अनपेक्षितपणे आजही तेच झाले असावे! तिने समीरला फोन लावला. समीर घरी आल्यावर, दोघांनी तिला डॉक्टरांकडे नेले. आई-बाबांजवळ बसलेली पृथा, डॉक्टरांकडे जाईपर्यंत शांत बसली होती. मात्र दवाखान्यात पोहोचल्याबरोबर ती अस्वस्थ व्हायला लागली. तिने विभाला कवटाळले. डॉक्टरांचे लक्ष पृथाच्या हालचालींकडे होते. अनुभवी नजरेच्या डॉक्टरांनी पृथाला असिस्टंट च्या मदतीने ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतवले आणि ते विभा-समीर कडे वळले."विभा-समीर, तुमची मनस्थिती मी समजू शकतो. मात्र पृथाचे असे वागणे, घाबरे होणे, आक्रमक होणे, अस्वस्थ होणे....या सर्व असुरक्षितपणाच्या भावना आहेत. काका-काकू तिचे जिव्हाळ्याने करायचे. तिच्यावर मायेचे पांघरून होते. तिला त्यांच्या कुशीत सुरक्षित वाटायचे.
मात्र तुम्ही दोघेही घरी नसता. दिवसभर जरी तिला बाईची साथ असली, तरी तिच्या करण्यात अकृत्रिमता असते. त्यामुळे पृथाला, हवी ती आपुलकी वाट्याला येत नाही. हा बदल तिच्या मेंदूला झेपत नाही आणि ती असे वागते.
यापुढे काळजी घ्या. मी गोळ्या लिहून देतो".
घरी परतायच्या वेळी, समीर-विभा सोबत, पृथा खूप आनंदात होती. बाहेर बघून आनंदाने टाळ्या वाजवित होती. तिचे निरागस हास्य! दोघांनाही विचारांच्या गर्द छायेत, नेऊन सोडत होते.
घरी आल्यावर रात्री समीरने, 'पृथाला चांगल्या निवासी शाळेत, जी अशा मुलांसाठीच राखीव असते, अशा ठिकाणी ठेवण्याचा मानस बोलून दाखवला. जेणेकरून ती समवयस्क मुलांच्या सानिध्यात आणि प्रशिक्षित, अनुभवी शिक्षकांच्या देखरेखीत तयार होईल'.
त्याचा हा विचार विभाला, अंतर्मुख करून गेला. समीरचे आणखीही म्हणणे होते की,"आपल्याला दुसरा चान्स घेता येईल आणि पृथाला एखादं भावंड ही सोबतीला होईल".
विभाचं मन मात्र या सगळ्या गोष्टीं करिता तयार नव्हते. ती आता वेगळ्याच निर्णयापर्यंत येऊन पोचली होती.....
"पृथाला, मी माझ्यापासून वेगळे करणार नाही. तिच्या प्रगतीची होणारी वाढ, मी तिच्या कलाकलाने विकसित होताना प्रत्यक्ष पाहिल. माझ्या मायेचे कोंदण मी तिला देईल. कुणाचीच उणीव भासू देणार नाही. हे सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आता माझी. त्याकरिता मला नोकरीवर पाणी सोडावे लागले तरी चालेल! पण मी माझ्या छकुलीला कुणाच्याही सुपूर्द करणार नाही. तिच्याशिवाय मी राहू तरी शकेल का?".
"तिच्या प्रत्येक टप्प्यावर, ही आई तिची सोबत करेल. तिच्या जाणिवांच्या परिघात ती एकटीच असणार नाही. ही आई, या लेकीच्या जाणिवा अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करेल".
तिने मनोमन निश्चय केला आणि पृथाच्या चेहऱ्याकडे बघितले. अतिशय शांत निरागस भाव!
तिचा हात हातात घेऊन तिने स्वतःशीच संकल्प केला. उद्याची पहाट विभासाठी, एका आईसाठी नवीन सुरुवात ठरणार होती. एका सुखद पण आव्हानात्मक मातृत्वाच्या प्रवासाकडे घेऊन जाणारी!.........
©® वीणा विजय रणदिवे
(कशी वाटली कथा, नक्की कळवा हं🙏🏻
मानसिक विकलांग मुलामुलींच्या आईचा मातृत्वाचा प्रवास हा आव्हानांनी खचाखच भरलेला असतो. आईची ही अनुभूती मांडण्याचा हा छोटासा भावस्पर्शी प्रयत्न🌹)